महाराष्ट्र नैसर्गिक आपत्तीप्रवण क्षेत्र आहे. ह्यामध्ये भूस्खलन, पूर, चक्रीवादळ, भूकंप, दुष्काळ आणि वीज पडण्याच्या घटनांचा समावेश होतो. मुसळधार पाऊस आणि मानवनिर्मित कारणांमुळे प्रामुख्याने पश्चिम घाट आणि कोंकण प्रदेशात भूस्खलनाची जोखीम वाढत आहे. याचा सर्वाधिक परिणाम रायगड, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांवर होतो. मान्सून काळात येणाऱ्या पुराचा फटका मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या शहरी भागांसह ग्रामीण आणि किनारपट्टी तसेच नद्यांच्या काठच्या भागांना मोठ्या प्रमाणात बसतो. महाराष्ट्राची भूवैज्ञानिक रचना गुंतागुंतीची असल्याने राज्य भूकंपसंकटग्रस्त आहे. मुंबई आणि ठाणे हे अति-जोखीम असलेल्या झोन IV मध्ये, पुणे आणि नाशिक मध्यम-जोखीम असलेल्या झोन III मध्ये, तर नागपूरसारखे आग्नेय भाग मधूनमधून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवणाऱ्या तुलनेने कमी जोखीम असलेल्या झोन II मध्ये समाविष्ट आहेत. अरबी समुद्राच्या विस्तीर्ण किनारपट्टीमुळे महाराष्ट्र पूर्वी चक्रीवादळांच्या दृष्टीने तुलनेने सुरक्षित मानला जात होता. मात्र, हवामान बदलाच्या परिणामामुळे आता चक्रीवादळांचा धोका वाढत आहे. खास करून मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर इथे मुसळधार पाऊस, जोरदार वारे, समुद्री लाटा आणि पूर यांचा प्रभाव जाणवत असल्यामुळे हे किनारी जिल्हे जोखमीच्या क्षेत्रात येतात. वारंवार पडणाऱ्या दुष्काळामुळे कृषी उत्पादन आणि जलसंपत्तीच्या उपलब्धतेला सतत धोका निर्माण होत आहे. पूर्व महाराष्ट्रात, विशेषतः चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये वीज पडण्याच्या घटनांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे मानवी जीवितासोबतच शेती आणि पशुधनालाही मोठा धोका निर्माण होतो.
दुष्काळ:
महाराष्ट्राला वारंवार तीव्र दुष्काळाला सामोरे जावे लागत असल्यामुळे त्याचा परिणाम लक्षावधी लोकांवर, शेती तसेच पाणी पुरवठ्यावर होतो. दुष्काळ वारंवारता निर्देशांकातील 1901ते 2021 ह्या कालावधीतील आकडेवारीमुळे राज्यातील विविध भाग किती दुष्काळप्रवण आहेत हे लक्षात येते. आयआयटी गांधीनगर येथील वॉटर अँड क्लायमेट लॅबने केलेल्या अभ्यासानुसार, पावसाळ्यासाठी प्रमाणित पर्जन्यमान वाष्पोत्सर्जन निर्देशांक (एसपीईआय) वापरून दुष्काळ वारंवारता निर्देशांक (डीएफआय) तयार करण्यात आला आहे. सदर निर्देशांक एसडीएमएच्या प्रकल्प व्यवस्थापन विभागाद्वारे तयार केला जातो आणि त्यात महाराष्ट्रात कुठे आणि किती वेळा दुष्काळ पडतो याचे वर्गीकरण केलेले असते.