बंद

    मिळालेली शिकवण आणि सर्वोत्तम कार्यपद्धती

    इरशाळवाडी भूस्खलन प्रकरणाचा अभ्यास

    19 जुलै 2023 रोजी रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी गावातील अनेक रहिवाशांना भूस्खलनामुळे प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेनंतर घेतलेल्या प्रतिसाद आणि मदत उपाययोजनांचे दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे. ह्या प्रसंगामुळे भविष्यातील आपत्ती रोखण्यासाठी धडे शिकण्याचे महत्व अधोरेखित झाले आहे. या दस्तऐवजात आपत्तीपूर्व तयारीसाठी आवश्यक उपाययोजना, सुधारित पायाभूत सुविधा, निवासविषयक कठोर नियम, धोक्यांचे नियमित अंदाज, भूस्खलन संकेतांचे निरीक्षण, तसेच स्वयंसेवी संस्था आणि स्वयंसेवकांचे प्रशिक्षण यावर भर देण्यात आला आहे. ह्या नोंदी महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन आणि प्रतिसाद क्षमता सुधारण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका पार पाडतील.

    इरशाळवाडी भूस्खलन प्रकरणाचा अभ्यास [पीडीएफ 2 एमबी]

    खारघर उष्माघात प्रकरणाचा अभ्यास

    महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळा 16 एप्रिल 2023 रोजी नवी मुंबईतील खारघर येथे पार पडला. कार्यक्रमादरम्यान उष्मालाटेत (उष्णतेमुळे थकवा येऊन आणि उष्माघातामुळे) दीर्घकाळ उन्हात राहिल्यामुळे अनेकांना त्याचे परिणाम भोगावे लागले. ह्या घटनेमुळे भविष्यातील आपत्ती रोखण्यासाठी धडे शिकण्याचे महत्व अधोरेखित झाले आहे. या दस्तऐवजात उष्णतेच्या इशाऱ्यांचे काटेकोर पालन, सार्वजनिक कार्यक्रमांचे काळजीपूर्वक नियोजन, असुरक्षित गटांचे संरक्षण, सुधारित पायाभूत सुविधा आणि सुरक्षितता वाढविण्यासाठी तसेच उष्मालाटेदरम्यान घराबाहेर पडून प्रवास करण्यापासून परावृत्त करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या परिणामकारक वापराची आवश्यकता ह्यावर या दस्तऐवजात भर देण्यात आला आहे.

    खारघर उष्माघात घटना चिकित्सा [पीडीएफ 1 एमबी]

    जालना जिल्हा ऑनलाइन पोर्टल

    गाव/तालुका आपत्ती व्यवस्थापन योजना जिल्हा स्तरावरील सर्व प्रशासकीय यंत्रणा आणि तलाठी, मंडल अधिकारी,तहसीलदार आणि अधिकाऱ्यांसाठी एका क्लिकवर उपलब्ध व्हावी ह्या उद्धेशाने जालना जिल्ह्यासाठी https://ddmajalna.com हे ऑनलाइन पोर्टल तयार करण्यात आले आहे. या पोर्टलवर तलाठ्यांसाठी लॉगिन प्रणाली तयार करण्यात आली आहे, ज्याद्वारे ते गाव आपत्ती व्यवस्थापन योजना ऑनलाइन भरू शकतील. लॉगिन केल्यानंतर, संबंधित गावांतील आवश्यक माहिती तलाठ्यांना सहजपणे भरता येईल. तहसीलदारांनाही लॉगिन सुविधा देण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांच्या तहसीलमधील गावनिहाय योजना पोर्टलवर अद्यतनित झाल्या आहेत की नाही, याची माहिती तहसील कार्यालयाद्वारे मिळेल. तसेच, तालुकानिहाय आपत्ती व्यवस्थापन योजना ऑनलाइन भरण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पोर्टलवर तलाठ्यांकरता ग्राम आपत्ती व्यवस्थापन योजनेची माहिती भरण्यासाठी लॉगइन तयार करण्यात आले आहे. लॉग इन केल्यानंतर तलाठी आपल्या कार्यक्षेत्रातील गावांची माहिती ऑनलाइन भरू शकणार आहेत. तहसीलदारांना ही लॉगिन देण्यात आले असून तहसील कार्यालयामार्फत त्यांच्या तालुक्याचा गावनिहाय आराखडा पोर्टलवर भरला आहे की नाही, याची अद्ययावत माहिती मिळणार आहे. या पोर्टलसाठी मोबाईल अ‍ॅप देखील विकसित करण्यात आले आहे. यामध्ये मदतीसाठी केलेला धावा प्रणाली पुरवण्यात येणार असल्याने, नागरिक आपत्तीच्या आपत्कालीन घटनेबाबत प्रशासनाला त्वरित माहिती आणि फोटो पाठवू शकतील. त्याचप्रमाणे, दैनंदिन हवामान अपडेट्स, पर्जन्यमान, जिल्ह्यातील प्रकल्पांचे पाणी पातळीचे तपशील, तसेच विविध आपत्तीमध्ये काय करावे आणि काय करू नये यावरील माहितीपत्रके या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येतील. आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक माहिती त्वरित पीडीएफ स्वरूपात उपलब्ध होईल, ज्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि वेगवान होईल.

    उजनी धरण पाणी फुगवटा (बॅकवॉटर), सोलापूरसाठी होडी सुरक्षेसाठी मानक कार्यपद्धती तयार करणे

    उजनी जलाशयातील वाशींबेपासून इंदापूर तालुक्यातील गंगावळणपर्यंत पसरलेला जलमार्ग स्थानिक रहिवाशांसाठी आणि कृषी मालवाहतुकीसाठी एक महत्त्वाचा आणि सोयीस्कर मार्ग आहे. मे 2024 मध्ये घडलेल्या बुडण्याच्या दुर्घटनेनंतर, हा मार्ग किफायतशीर आणि वेळ वाचवणारा असल्याने त्याचे महत्त्व लक्षात घेऊन सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने 30 सप्टेंबर 2024 रोजी एक बैठक आयोजित केली. या बैठकीत माननीय जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना 2005 च्या आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील कलम 30 अंतर्गत होडी सुरक्षेसाठी मानक कार्यपद्धती (एसओपी) सादर करण्याचे निर्देश दिले. या निर्देशान्वये विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय कायदे विचारात घेऊन तसेच संबंधित अधिकारी व तज्ञांशी चर्चा करून उजनी जलाशयातील होडी सुरक्षेसाठी मानक कार्यपद्धती एसओपी विकसित करण्यात आली./p>

    सिद्धेश्वर यात्रेदरम्यान होणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थापनाचा अभ्यास

    दरवर्षी मकर संक्रांतीला पार पडणारी सिद्धेश्वर मंदिर यात्रा हा महाराष्ट्राचा बहुमोल सांस्कृतिक ठेवा आहे. संत श्री सिद्धरामेश्वर यांची कथा नंदी ध्वज मिरवणूक, अक्षता सोहळा तसेच होम विधी अशा विविध चालीरीतींच्या माध्यमातून साजरी केली जाते. ह्याला जत्रेतल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमांची जोड मिळते. 2024 मध्ये ह्या यात्रेला महाराष्ट्रभरातून आणि जवळपासच्या राज्यांतून सुमारे दोन लाख भाविकांनी हजेरी लावली होती. ह्या यात्रेचं लिंगायत आणि वीरशैव समाजाच्या दृष्टीने धार्मिक महत्व असून सोलापूरमधील सर्व जाति-धर्मांतील लोक मोठ्या संख्येने यात सहभागी होतात. ह्या दस्तऐवजात गर्दीच्या परिणामकारक नियोजनाचे महत्व तसेच गर्दीच्या वेळी सुरक्षितता राखण्यासाठी चेंगराचेंगरीसारख्या घटनांना राज्यस्तरीय आपत्ती म्हणून मान्यता देण्याची गरज ह्यावर भर देण्यात आला आहे.

    सिद्धेश्वर यात्रा भेटीचा अहवाल [पीडीएफ – 3 एमबी]

    महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर होणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थापनाचा अभ्यास

    भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी म्हणून दरवर्षी 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. दरवर्षी लाखो लोक या कार्यक्रमासाठी दादर, मुंबई येथील चैत्यभूमीला भेट देतात. भारतभरातून, विशेषत: महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात तसेच तिबेट, भूतानसारख्या शेजारच्या देशांमधून पर्यटक येतात. 2024 मध्ये प्रचंड गर्दी असूनही चेंगराचेंगरी, उष्माघात किंवा आगीच्या घटना न घडता महापरिनिर्वाण दिन व्यवस्थितपणे साजरा झाला. सदर दस्तऐवजात येथील गर्दीच्या व्यवस्थापन पद्धतीचा महाराष्ट्रातील इतर ठिकाणी वापर करण्यावर भर देण्यात आला असून गर्दीच्या वेळी सुरक्षितता राखण्यासाठी चेंगराचेंगरीसारख्या घटनांना राज्यस्तरीय आपत्ती म्हणून मान्यता देण्याच्या कल्पनेला पाठिंबा दर्शवण्यात आला आहे.

    महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर होणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थापनाचा अभ्यास [पीडीएफ – 2 एमबी]

    

    गडचिरोलीतील आपत्ती व्यवस्थापनसंदर्भातला अभिनव उपक्रम

    आपत्ती शिक्षण, बालकेंद्रित आपत्ती जोखीम कमीकरण (सीसीडीआरआर) आणि शालेय सुरक्षितता यांसाठी एक अभिनव उपक्रम म्हणून गडचिरोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने 5 फेब्रुवारी 2025 रोजी जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापनावरील सामान्य ज्ञान परीक्षा आयोजित केली होती. या उपक्रमात जिल्ह्यातील विद्यार्थी आणि शाळा प्रशासनाने उत्साहाने सहभाग घेतला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूकता वाढवणे हा होता.

    पंढरपूर यात्रा आपत्ती प्रतिसाद प्रणाली (आयआरएस) विकसित करणे आणि तिची अंमलबजावणी

    पंढरपूर हे एक महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र आहे. इथे भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी येतात. “दक्षिण काशी” म्हणून ओळखले जाणारे आणि महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले हे स्थळ संपूर्ण महाराष्ट्र आणि शेजारील राज्यांमधून मोठ्या संख्येने भाविकांना आकर्षित करते. आषाढी, कार्तिकी, माघ आणि चैत्र एकादशीसह विविध सण-उत्सव साजरे करण्यासाठी दर वर्षी लाखो भाविक इथे एकत्र येतात. या काळात विविध संतांच्या पालख्या देखील महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणांहून पंढरपूर येथे पोहोचतात. विशेषतः आषाढी वारीमध्ये 20 लाखांहून अधिक भाविक सहभागी होतात. बहुसंख्य भाविक महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि इतर राज्यांमधून अनवाणी चालत पंढरपूरला पोहोचतात. ते प्रथम पुंडलिकाचे दर्शन घेतात, त्यानंतर भीमा नदीत (पंढरपुरात तिला चंद्रभागा म्हणतात) स्नान करून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी जातात. या प्रचंड गर्दीचे परिणामकारकपणे व्यवस्थापन करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाने ” घटना प्रतिसाद प्रणाली (इन्सिडंट रिस्पॉन्स सिस्टम)” (आयआरएस) विकसित करून अंमलात आणली आहे. ह्याद्वारे प्रत्येक भागधारकाच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. 2015 मध्ये वापरात आल्यापासून ही प्रणाली नियमितपणे अद्ययावत केली जाते. ह्यामुळे सदर प्रणालीच्या कार्यक्षमतेत भर पडते. ह्या प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे आजपर्यंत यात्रेदरम्यान चेंगराचेंगरीच्या कोणत्याही घटना घडलेल्या नाहीत.

    पंढरपूर यात्रेसाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करणे

    सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या तीर्थस्थळी आषाढी, कार्तिकी, माघ आणि चैत्र एकादशी साजरी करण्यासाठी 20 लाखांहून अधिक भाविक जमतात. ह्या यात्रेदरम्यान विविध संतांच्या पालख्या, पुंडलिकाचे दर्शन, चंद्रभागा नदीतील स्नान आणि विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन ह्या प्रमुख धार्मिक परंपरा पार पडतात. 2023 मध्ये सोलापुरात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (डीडीएमए) बैठकीत पंढरपूर तीर्थक्षेत्रातील यात्रा वारी सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वंकष आराखडा आवश्यक असल्याचे ठरविण्यात आले. एका प्रसिद्ध गर्दी व्यवस्थापन तज्ञाच्या मदतीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पंढरपूरतीर्थक्षेत्र कार्यक्रमांसाठी घटना प्रतिसाद प्रणाली आधारित आपत्ती व्यवस्थापन आराखडा” तयार केला. पंढरपूरमधील धार्मिक कार्यक्रमांचे संपूर्ण व्यवस्थापन धोरण आखणे, तसेच आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या व्यवस्थापनावर विशेष लक्ष केंद्रित करणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे.