राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन आराखडा (एनडीएमपी) भारतातील आपत्ती जोखीम कपात तसेच व्यवस्थापनासाठी एक सर्वसमावेशक रचना आहे. आपत्ती जोखमीत कपात करण्यासाठी ही योजना सेंदाई चौकटशी सुसंगत असून ह्यात विविध नैसर्गिक तसेच मानवनिर्मित धोक्यांचा समावेश होतो. ह्या योजनेत सक्रिय दृष्टिकोनावर भर देत सौम्यीकरण, पूर्वतयारी, प्रतिसाद आणि पुनर्प्राप्तीसाठी आखलेल्या धोरणांची रूपरेषा दिली आहे. त्याचप्रमाणे सदर योजनेत राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा पातळीवरील विविध संस्थांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या तपशीलवार देण्यात आल्या आहेत. समन्वयपूर्ण प्रयत्न आणि परिणामकारक संसाधन व्यवस्थापनाच्या माध्यमातून देशातील आपत्तींना तोंड देण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवणे हे एनडीएमपीचे ध्येय आहे.