आपत्तीपूर्व तयारी तसेच संकट सौम्यीकरण परिणामकारक होण्यामध्ये जनजागृती आणि माहितीचा प्रसार महत्वाची भूमिका बजावतात. मुद्रित, इलेक्ट्रॉनिक तसेच समाज माध्यमांद्वारे आपत्तीविषयक माहितीचा प्रसार केल्यामुळे नागरिकांना जोखीम, सुरक्षा उपाययोजना, स्थलांतर योजना तसेच आपत्कालीन संपर्क ह्याबद्दल जागरूक करता येते. त्याचबरोबर ह्याद्वारे आत्मनिर्भरतेत भर पडून व्यक्ती तसेच समुदाय (गट) यांच्या आपत्ती निवारणासाठी उपाययोजना करू शकतात.
महाराष्ट्र शासनाने विविध समाज माध्यमांवर जनजागृतीकरता अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.
आपत्ती जोखीम कमी करण्यासंबंधीच्या पंतप्रधानांच्या दहा कलमी अजेंड्यानुसार, कार्यसूची (अजेंडा) क्रमांक 7 मध्ये “आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी समाज माध्यमे आणि मोबाइल तंत्रज्ञानाच्या संधींचा उपयोग करणे ” नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने सोशल मीडिया आणि मोबाइल तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेल्या संधींचा अधिकाधिक उपयोग केला आहे. महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासाठी एक्स (ट्विटर), फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्युब यांसाठी स्वतंत्र सोशल मीडिया हँडल तयार करण्यात आले आहेत. ह्या मंचाद्वारे जनजागृती, पूर्व-सूचना आणि आपत्ती व्यवस्थापनासंबंधी माहिती नियमितपणे प्रसारित केली जाते.